उद्योग राज्यमंत्री अतुल सावे रविवारी शहरात; कार्यकर्त्यांकडून स्वागताची जय्यत तयारी

Foto

औरंगाबाद: दीर्घ प्रतीक्षेनंतर औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल सावे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली असून, उद्योग, खनिकर्म व अल्पसंख्याक खात्याचे राज्यमंत्रिपद त्यांना मिळाले आहे. सावे यांना मंत्रिपद मिळाल्याबद्दल मोठा जल्‍लोष औरंगाबादेत करण्यात आला. गेले आठवडाभर विधिमंडळ अधिवेशनामुळे त्यांना शहरात येता आले नाही. आता रविवारी सकाळी सावे यांचे शहरात आगमन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 गेल्या सोमवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. गेली साडेचार वर्षे सावे यांना मंत्रिपद मिळावे यासाठी देव पाण्यात ठेवून असलेले कार्यकर्ते जाम खूश झाले आहेत. नवनियुक्‍त उद्योग व अल्पसंख्याक राज्यमंत्री सावे यांचा औरंगाबादेत जंगी सत्कार करण्यात येणार आहे. शनिवारी संध्याकाळी सावे यांचे शहरात आगमन होणार होते. मात्र, त्या दिवशी भाजपची महत्त्वाची बैठक मुंबईत असल्याने सावे येऊ शकणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. रविवारी सकाळी त्यांचे कारने शहरात आगमन होणार आहे. राज्यमंत्री अतुल सावे यांच्या सत्काराची जय्यत तयारी भाजपने केली असून पक्ष कार्यालयात गुलमंडी तसेच सिडको-हडको वासियांतर्फेही सावे यांच्या सत्काराचे नियोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर विविध उद्योग संघटना आणि सामाजिक संघटनांनीही त्यांच्या सत्काराचे नियोजन करत आहेत.